अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी व कौटुंबिक वाद समुपदेशनाने सोडविण्यासाठी अहमदनगर पोलीस दलाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या भरोसा सेलमध्ये अनूभवी प्रौढ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणुक करुन त्यांना गणवेश सक्तीचा करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी संघाच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी संघाचे जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे, संदीप ठोंबे, अनिल गायकवाड, संतोष वाघ, संदीप कापडे, शरद महापूरे, नितीन साठे, जावेद सय्यद, विजय दुबे, गोरख पवार आदी उपस्थित होते.

भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशनाने कौटुंबिक वाद मिटवण्याचे कार्य सुरु आहे. मात्र सदर सेल मध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे प्रौढ नसल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी येणारे प्रकरण हाताळण्यासाठी अडचणी येतात. जिल्हा पोलिस दलात मोठ्या संख्येने अनुभवी अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

त्यांची नियुक्ती भरोसा सेलमध्ये केल्यास येथील प्रकरणे हाताळण्यासाठी व कौटुंबिक वाद समुपदेशनाने सोडविण्यासाठी हातभार लागणार आहे.

तसेच या विभागातील कर्मचारी गणवेशात नसल्याने सर्वसामान्यांना अधिकारी कोण किंवा कर्मचारी कोण? हे कळणे अवघड जाते. येथील अधिकारी, कर्मचारी गणवेशात असल्यास एक दबदबा राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.