अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  गळनिंब येथील सिध्‍देश्‍वर देवस्‍थानाचा तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्‍हावा, यासाठी आपण पाठपुरावा करु, अशी ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्‍य माणसाला कोणत्‍याही अपेक्षा राहीलेल्‍या नाहीत, लोकांपासून हे सरकार दूर गेले असल्‍याची टिकाही त्‍यांनी केली.

गळनिंब येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आला. शामराव चिंधे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या याकार्यक्रमास सभापती सौ.संगिता शिंदे, जिल्‍हा सदस्‍य शरद नवले, माजी सभापती दिपक पठारे, नानासाहेब शिंदे, अनिल थोरात संपतराव चितळकर, सौ.कल्‍याणी कानडे, आण्‍णासाहेब शिंदे, जनार्धन घोरपडे, सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच सौ.कविता भोसले, सिध्‍देश्‍वर देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष सुनिल शिंदे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात आ.विखे पाटील म्‍हणाले की, मागील दोन वर्षांपासुन राज्‍य सरकारच्‍या उदासीनतेमुळे सर्वच व्‍यवस्‍था ठप्‍प झाल्‍या आहेत, शेतकरी चिंतेत आहेत परंतू वाळू माफीया बिनधास्‍तपणे वावरत आहेत, शेती मालाला सरकार भाव देवू शकले नसल्‍याने उत्‍पादीत माल शेतक-यांना फेकून द्यावा लागला.

परंतू सरकारला त्‍याची कुठलीही जाणीव नाही, गावपातळीवर आता युवकांनीच आता शेती आणि दुग्‍ध व्‍यवसायाबाबत एकत्रित येवून काम केले करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

बेसूमार वाळू वाहतूकीमुळे पर्यावरणाबरोबरच आता सामाजिक प्रश्‍नही निर्माण झाले आहेत, मध्‍यंतरीच्‍या काळात कोल्‍हार ते बेलापूर रस्‍त्‍यावरुन मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाल्‍यामुळेच या रस्‍त्‍याची दुर्दशा झाली. याप्रश्‍नाकडे स्‍थानिक लोकप्रतिनिंधींनी दुर्लक्ष केले आहे.

रस्‍त्‍यांच्‍या कामाबाबत आता महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनाच जाब विचारावा लागेल असे सुचक वक्‍तव्‍य आ.विखे पाटील यांनी केले. गळनिंब येथे प्रवरा सहकारी बॅंकेचे विस्‍तार कक्ष सुरु करण्‍याबाबतही तातडीने कार्यवाही करण्‍याचे त्‍यांनी याप्रसंगी सांगितले.