Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना रोहित शर्मा यांनी उपस्थितांशी मराठीत संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाले की ग्रामीण भागातून चांगले क्रिकेटपटू व्हावे हीच भावना या उभारण्यात येणाऱ्या अकादमीच्या माध्यमातून असून या अकादमीतून भविष्यामध्ये यशस्वी जयस्वाल तसेच जसप्रीत बुमराह,
शुभमन गिल सारखे खेळाडू मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर या परिसरात आल्यावर मनाला खूप शांती मिळाली व मी परत नक्की या ठिकाणी येईल अशा पद्धतीची ग्वाही देखील त्यांनी बोलताना दिली.
राशीन येथे झाले छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
भारतासाठी वर्ल्डकप जिंकणे आमचे ध्येय होते. ग्रामीण भागातून चांगले क्रिकेटपटू व्हावे हीच भावना अकादमी उभारण्यात आहे. या अकादमीतून भविष्यात शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे उत्तम खेळाडू भारताला मिळतील. या भूमीत आल्यावर मनाला शांती मिळाली. मी परत नक्की येईन, अशी ग्वाही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी दिली.
त्यांनी मराठीत भाषण करीत उपस्थितांची मने जिंकली. राशीन (ता. कर्जत) येथे गुरुवारी (दि.३) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुल भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह राजकीय पदाधिकारी, क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची क्रिक किंगडम क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण खेळाडूंसाठी स्टेडियम आणि संकुल उभारण्यात येत आहे. कर्जत जामखेडचा आवाज मैदानापेक्षा जास्त असून हा जल्लोष एक अंतिम सामन्यापेक्षा जास्त दिसत आहे.
येथील तरुणांमध्ये तो खेळाडूवृत्ती दिसत आहे. आम्ही सर्व खेळाडू याच जल्लोषाच्या आणि प्रेमाच्या आधारे सामने जिंकतो. असेच प्रेम सर्वांना कायम द्या, असे आवाहन रोहित शर्मा यांनी केले.यावेळी इंडियन आयडल फेम गायक रोहित राऊत, संगीत सम्राट फेम श्रावणी महाजन यांच्या हिंदी- मराठी गाण्याची मेजवानीने, तर तांबडी चामडी फेम डीजे क्रेटेक्स यांनी कार्यक्रमात रंगत वाढवली.
मूळ जागेकडे चिटपाखरूही फिरकले नाही..
राशीन येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा विद्यालयाची शेती जेथेआहे, तेथील २३ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम होणार आहे. मात्र, मोठा गाजावाजा करून, विद्युत रोषणाईचा मोठा झगमगाट करून शाही थाटात स्टेडियमचे भूमिपूजन त्यांनी डिजिटल स्वरूपात केले.
स्टेडियमच्या मूळ जागेवर भूमिपूजन न करता इतरत्र ५ किलोमीटर अंतरावरील जागेत हे भूमिपूजन करण्यात आले. स्टेडियमच्या (मैदान) मूळ जागेकडे चिटपाखरूही फिरकले नाही. भूमिपूजन कार्यक्रम झाला ती जागा जगदंबा देवस्थानची आहे.
त्यामुळे कार्यक्रमाला आलेले काहीजण येथेच स्टेडियम होणार का? असा प्रश्न विचारत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी स्टेडियमचे काम होणार आहे, ती जागाही अनेकांना माहित नव्हती.