file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- ऊसाच्या एफआरपी (रास्त आणि किफायतशीर भाव) दरात क्विंटलमागे पाच रुपयांनी वाढ करुन हा दर २९० रुपयांवर नेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. एफआरपी दरातील वाढीचा देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होईल, अशी माहिती उद्योग आणि व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ऊसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत उसाची एफआरपी (रास्त आणि मोबदला देणारी किंमत) सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

त्या प्रस्तावाला अखेर मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याचा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.

झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) 285 वरून 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिलीय. एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढलीय. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती.

त्यामुळे आता उसाची एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. पीयूष गोयल म्हणाले की, साखरेची एफआरपी 290 प्रति क्विंटल आहे, जी 10 टक्के वसुलीवर आधारित असेल. 70 लाख टन साखरेची निर्यात होणार आहे. त्यापैकी 55 लाख टन झालीय. सध्या 7.5 टक्के ते 8 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे.

पुढील काही वर्षांत हे मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत होणार आहे. आजच्या निर्णयानंतर भारत हा एकमेव देश असेल, जिथे ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीच्या सुमारे 90-91% ऊस मिळणार आहे. जगातील देशांमध्ये ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीच्या 70 ते 75% ऊस मिळतो. सरकारच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.

उसाची एफआरपी किंमत 290 रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा 87% परतावा मिळेल. इथेनॉल उत्पादन, साखर निर्यातीला प्रोत्साहन, साखर उद्योगाला बफर स्टॉकद्वारे पैसे देणे, अशा निर्णयांनी ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळून त्यांना मोठा फायदा होणार आहे.

ऊस लागवडीसाठीचा खर्च, मागणी आणि पुरवठा, जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर या सर्व बाबींचा विचार करुन एफआरपी दर काढला जातो. सध्या जाहीर करण्यात आलेला २९० रुपयांचा दर हा आतापर्यंतचा सर्वाधिक एफआरपी दर आहे.गतवर्षी सरकारने एफआरपी दरात क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ करुन ते २८५रुपयांवर नेले होते.

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना यासारख्या राज्यांत स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईजेसद्वारे (एसएपी) ऊस उत्पादकांना ऊसाला भाव दिला जातो. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या दरापेक्षा हा भाव जास्त असतो.