पोलीसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न -आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे.पोलीसांना पुढे करून सरकारने राज्यात एकप्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

आ.विखे पाटील म्हणाले की,मंत्री राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे.राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

यापुर्वी भाजपच्या नेत्यांवर शिवसेनेकडून अतिशय खालच्या स्तरावर जावून टिका केली गेली.त्यावेळी पोलीसांना कायदा आठवला नाही.

आज पर्यतच्या झालेल्या दसरा मेळाव्यातील शिवसेना नेत्यांची वक्तव्यही पोलीस प्रशासनने दुर्लक्षित केली, मग पोलीसाना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलीस बळाचा वापर करून राज्यात सरकारने निर्माण केलेले वातावरण आणि दहशत अतिशय दुर्दैवी असून,भाजप कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले सुध्दा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयम बाळगला आहे.परंतू अधिक अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर जशास तसे उतर देण्याची आमची तयारी असल्याचा इशारा आ.विखे यांनी दिला.