अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी जागृती केली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदीरे व नदीघाट बांधले.

अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी आमदार जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेवक राहुल कांबळे, उबेद शेख, संभाजी पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, निलेश बांगरे, मळू गाडळकर,

विजय सुंबे, सोन्याबापू घेमुड, संतोष लांडे, निलेश हिंगे, अजिंक्य भिंगारदिवे, बहिरु कोतकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार जगताप यांनी समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान आहे. महिलांसाठी त्यांचे कार्य स्फुर्तीस्थान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रा. माणिक विधाते यांनी अहिल्यादेवी होळकर हे सक्षम स्त्रीचे मुर्तीमंत उदाहरण आहे. त्या आदर्श प्रशासक होत्या. अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना सन्मानाची वागणुक मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.