अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पारनेर तालुक्यातील घाणेगाव शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजु आजगन उर्फ अर्जुन काळे (वय ३५) याला जेरबंद केले. तसेच त्याने साथीदारासोबत घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबुल करत सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांना दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील प्रकाश अर्जुन चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल होता. याबाबत पोलिस तपास करत असताना गुप्त माहिती मिळाली की ,सदरची घरफोडी आरोपी राजु अर्जुन काळे याने त्याच्या साथीदारासह केली असून तो घाणेगाव शिवारात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी या शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजु आजगन उर्फ अर्जुन काळे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केला असल्याचे कबुल करत सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले १७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे येथुन चोरी केलेली ३० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली.