अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरेंट १५ ऑगस्टपासून रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कोरोना काळातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे.

तसेच मॉल्स १५ ऑगस्टनंतर सुरु होणार असून मॉल्समध्ये जाण्याअगोदर लसीचे दोन डोस घेणे नागरिकांसाठी आवश्यक ठरणार आहे. तसेच खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहणार आहे.

दरम्यान, वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे . हॉटेल, मॉल्सवरील वेळेचे बंधन शिथिल करताना काही अटी घालण्यात येणार आहेत. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.