पावसाळ्या मध्ये घराची काळजी कशी घ्यावी. . .

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- आता पाऊस सुरू झाल्याने सगळ्याच घरांत कोविडच्या पार्श्वभूमीवर घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे सुरूच आहे. त्याचबरोबर आता घराची देखील काळजी घ्यावी लागते आहे.

त्यासाठी या टिप्स. पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या पाइप्सना बऱ्याच वेळा उन्हाळ्यात तडे गेलेले असतात. पाऊस पडू लागल्यावर गच्चीचे पाणी जेव्हा त्या पाइपमधून गळते, तेव्हाच आपल्याला ते कळते. अशावेळी सर्व पाइप्सची पाहणी करून जे पाइप गळत असतील त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अथवा ते पाइप बदलावेत.

आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतींना बऱ्याच वेळा तडे पडलेले आढळतात. बरेच लोक पावसाळ्याच्या आधी ते तडे बुजवण्याचा प्रयत्न करतात. कित्येक वेळा ते तडे तेथे थोडे खोदून मोठे करतात व नंतर बुजवतात, पण खरे म्हणाल तर असे करू नये. भिंतीवरच्या पडलेल्या सर्वच तड्यांमधून पाणी झिरपेलच असे नाही.

उलट कित्येक वेळा ते तडे थोडे रुंद करण्याच्या नादात तिथूनच ओल येण्याची शक्‍यता असते. जी गोष्ट भिंतींमधल्या ओलीची तीच गोष्ट छतातून गळणाऱ्या पाण्याची. पाऊस चालू झाल्यावर जर छत गळत असेल, तर त्याचीही दुरुस्ती पावसाची थोडी जरी उघडीप मिळाली तर लगेच करावी.

काही लोक वर्षानुवर्षे अशा गळतीचे दुरुस्ती काम करत नाहीत. अशावेळी या गळतीमुळे स्लॅबच्या आतील सळया गंजून खराब होण्याची शक्‍यता असते व स्लॅबलाही धोका पोहोचू शकतो. म्हणून स्लॅबची गळती त्वरित थांबवण्याची उपाययोजना करावी.

बऱ्याच वेळा लोकांना वाटते, की छत गळायला लागले तर छतावरील वॉटर प्रूफिंगचे सर्व काम पुन्हा करावे, पण तसे नसते. जेथे गळत असते त्याच्या वरच्या भागावर तडे किती आहेत ते पाहावे जर इमारतीला बेसमेंट असेल, तर तेथे अथवा लिफ्टच्या डक्टमध्ये कुठे पाणी जमा होत नाही ना हे बघावे.

लिफ्टच्या डक्टमध्ये पाणी जमा होत असेल, तर त्वरित लिफ्ट वापरणे बंद करावे व त्यातील पाणी पूर्ण काढून व दुरुस्ती काम करून घ्यावे. नंतरच्या पावसात पुन्हा पाणी जमा होत नाही ना हे पाहून मगच लिफ्ट वापरण्यास सुरुवात करावी. सोसायटीच्या आवारातील पावसाचे पाणी वाहताना त्याच सोसायटीच्या जमिनीखालील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जात नाही ना, हेही तपासून पाहावे.

इमारतीला जर रंगकाम करावयाचे असेल, तर ते पाऊस सुरू होऊन दोन महिने झाले, पावसाचा पहिला जोर ओसरला की करावे. म्हणजे नंतर जो थोडा पाऊस पडेल त्याचा उपयोग सिमेंट पेंट मारला असेल तर त्याच्या क्‍्युरिंगसाठी होऊ शकतो व रंगकामानंतर कुठे ओल नाही ना, हेही तपासून पाहाता येते.

पाऊस पडत असताना पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपचे तोंड काहीतरी कचरा पडून चोक होत नाही ना, हेही पाहावे. बर्‍याच वेळा पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगतात. त्या दरवाजाची फ्रेमही लाकडी असेल तर शक्‍यतो दरवाजाऐवजी फ्रेमला रंधा मारावा व दरवाजा लागत आहे ना हे पाहावे, तसेच लोखंडी ग्रिल अथवा रेलिंग पावसामुळे कुठे गंजले आहे का, हेही तपासून बघावे व कुठे रंग निघाला असेल तर लगेच ऑइल पेंटने रंगकाम करून घ्यावे.