…. तर शिवाजीराव कर्डिले अहमदनगर लोकसभेचे खासदार झाले असते ! तुम्हाला माहीत आहे हा इतिहास ?

Ahmednagarlive24
Published:
Shivaji Kardile

Ahmednagar Politics News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. मात्र या बालेकिल्लाला भाजपाने खिंडार पाडले आणि आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड बनला आहे. भारतीय जनता पक्षाने 2009 पासून सलग या मतदारसंघावर विजयी पताका फडकवली आहे. यापूर्वी मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते.

2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख हे या जागेवरून खासदार झाले होते. पण 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली. या गटबाजीचा फायदा भाजपाने घेतला आणि नगर दक्षिणमध्ये आपला झेंडा रोवला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी हे विजयी झालेत. पुढे 2014 मध्ये देखील दिलीप गांधी यांनी येथून दुसऱ्यांदा विजय मिळवला.

2019 मध्ये मात्र दिलीप गांधी यांच्या ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि डॉक्टर विखे यांनी या जागेवरून पहिल्यांदा खासदार होण्याचा बहुमान पटकावला. आता 2024 लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने या जागेवर विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश लंके यांना उमेदवारी मिळाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत विखे विरुद्ध लंके अशी जोरदार फाईट पाहायला मिळणार आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महायुतीने आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार सुरू केला आहे. पण, आज आपण 2009 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीबाबत माहिती पाहणार आहोत. त्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला कसा सुरंग लावला हे जाणून घेणार आहोत.

…..तर शिवाजीराव कर्डिले नगर दक्षिणचे खासदार राहिले असते
2009 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन विद्यमान खासदार तुकाराम गडाख यांचे तिकीट कापले. मात्र गडाख यांना निवडणूक लढवायची होती यामुळे त्यांनी मायावती यांच्या बीएसपी पक्षात प्रवेश घेतला. गडाख बीएसपीकडून या जागेवर निवडणुकीसाठी उभे राहिलेत. खरतर 2009 मध्ये राज्यात आणि केंद्रात काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. 2004 मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती यामुळे 2009 मध्ये देखील ही जागा त्यांच्याकडेच राहणार होती.

यानुसार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना तिकीट दिले. मात्र आघाडीच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील पाथर्डीचे तत्कालीन आमदार राजू राजळे नाराज झालेत. राजू राजळे यांना लोकसभा लढवायची होती यामुळे त्यांनी काँग्रेस सोबत बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली. म्हणजेच त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांमध्ये फाईट झाली.

याचा फायदा मात्र भारतीय जनता पक्षाला झाला. 2009 च्या निवडणुकीचा निकाल लागला, यात भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी यांना तीन लाख 12 हजार 47 एवढी मते मिळालीत, ते या जागेवरून विजयी झालेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना दोन लाख 65 हजार 316 मते मिळालीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत. राजू राजळे यांनी तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत.

तत्कालीन खासदार तुकाराम गडाख यांना मात्र फक्त 11000 मत मिळवता आली, ते बी एस पी च्या तिकिटावरून निवडणूक लढले होते. एकंदरीत जर राजळे यांनी काँग्रेस सोबत बंडखोरी केली नसती आणि अपक्ष निवडणूक लढवली नसती तर दुसऱ्या क्रमांकावर असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले असते. अर्थातच काँग्रेस अन राष्ट्रवादीच्या अहमदनगरच्या बालेकिल्ल्याला भाजपाने सुरंग लावला खरा पण याला या दोन्ही गटांमधील अंतर्गत गटबाजीच कारणीभूत ठरली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe