मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : लोअर परळ पुलाचे काम होणार या महिन्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : काँक्रीटीकरण आणि गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे लोअर परळ रोड पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका सुरू होण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपतीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.पालिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा विचार करत आहे, तर संपूर्ण पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खुला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुलाची पश्चिम दिशेची एक बाजू जूनमध्ये सुरू केली तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत हुकली असून अद्याप पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता पूल सुरू होण्यासाठी सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करी रोड, भायखळा परिसरात वाहतुकीचा कणा लोअर परळ ( डिलाईल रोड) पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्यामुळे जुलै २०१८ ला बंद करण्यात आला. विविध समस्यांमुळे या पुलाचे काम रखडले.

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे आणि पालिका यांनी मिळून बांधलेला हा पूल आहे. रेल्वेच्या हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला निधी दिला आहे.

या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिकेकडून केले जात आहे.

या कामासाठी पालिकेने १३८ कोटींचे कंत्राट दिले आहे. या पुलाची पश्चिमेकडील मार्गिका १ जून पासून वाहनचालकांसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या किमान ५ वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचा एक टप्पा पूर्ण झाला. मात्र, पूर्वेकडील बाजू अद्याप सुरू न झाल्यामुळे संपूर्ण पुलाचा अद्यापही वापर करता येत नाही.

जूनमध्ये पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केल्यानंतर, त्याच दरम्यान बांधकामाच्या खडीच्या टंचाईमुळे पुलाच्या कामावर परिणाम झाला. ‘जुलैमध्ये मुसळधार पाऊस असल्याने काम करण्यास अडथळे आले. अन्यथा ऑगस्टच्या अखेरीस काम पूर्ण झाले असते,’ असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

सप्टेंबरपर्यंत पुलाचे काम होणार पूर्ण पुलाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. कामास विलंब होणार नसल्याचा दावा करत नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.