file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  जून महिना गेला पण पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही. त्यानंतर जुलै मध्ये काहीसा जोरदार पाऊस झाला मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे.

दरम्यान पाऊस लांबल्यामुळे शेतातील उभे पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. यामुळे मुळा धरणातून पाण्याचे एक आवर्तन शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी तात्काळ सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

याबाबत शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट आर्वतनाच्या प्रश्‍नावर चर्चा केली. दरम्यान आर्वतनाच्या मुद्द्यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी लवकरच कार्यवाही करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.

गेल्या महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सदरची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. मागील वर्षी अति पावसाने पिके गेली, व आता चालू वर्षी पावसाने दिलेल्या ताणामुळे पिके जळू लागली आहेत. शेतकर्‍यांनी पिकांसाठी कर्ज काढून खते, बियाणे खरेदी करुन मशागती केली आहेत.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी मुळा धरणाचे एक आवर्तन सोडल्यास पिके वाचू शकणार असल्याचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.