file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे, मशागतीची सुरुवात झाली, अशावेळी बहुतेक शेतकरी बैल खरेदी करतात.

त्या दोन सवंगड्यांच्या साथीने हिरवं शिवार फुलते. यंदा मात्र शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी यंदाची मशागत यंत्राच्या साहाय्याने करण्याची वेळ आली आहे.

तेव्हा करोना नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा परिसर मोठा असून, ८९ गावे कार्यक्षेत्रातील संबंधितांचा दैनंदिन व्यवहार कोपरगाव बाजार समितीशी निगडित आहे.

सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असून, आसपासच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शेळी मेंढी पालन करून, त्यावर चरितार्थ चालवणाऱ्या घटकांची संख्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद असल्याने त्याचा अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे.

जनावरांची खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने, त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करून, जनावरांचा बाजार सुरू व्हावा, म्हणून प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.

राज्यातील अन्य बाजार समिती कार्यक्षेत्रात बहुतांश ठिकाणी जनावरांचे बाजार सुरू झालेले आहेत. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करून जनावरांचा बाजार सुरू व्हावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.

यावर तातडीने आदेश काढून कोपरगाव बाजार समितीत जनावरे व शेळी मेंढी बाजार सुरू करावा असे स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.