देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणे, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या.

त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तर, स्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

विजेत्या उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्ताहासाठी देशभरातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती, त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन आयोजित सप्ताहात मंत्री, गुंतवणूकदार, तज्ञ, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज गौरविण्यात आले.

प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले. मंत्री नवाब मलिक यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या सप्ताहास देशभरातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. एकविसावे शतक हे डिजीटल क्रांतीचे शतक आहे, यामध्ये जगात भारत देश अग्रस्थानी राहील. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आपले विशेष योगदान देत आहे.

स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबरोबरच यासंदर्भातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. विविध खरेदी, शासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्येही तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. राज्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. यापुढील काळातही युवक-युवती आणि महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनामार्फत विविध निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, देशाच्या ग्रामीण भागासह शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या अनुषंगाने सप्ताहामध्ये सहभागी तरुणांनी विविध संकल्पना मांडल्या.

याशिवाय कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या बनलेल्या आरोग्य क्षेत्रासाठीही नवनवीन संकल्पना सादर करण्यात आल्या. मत्सविकाससारख्या क्षेत्रासाठीही तरुण नवनविन संकल्पना शोधत आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून या सर्व नवसंकल्पनांना गुंतवणूकदार तसेच शासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. अशा प्रयत्नातून स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

उद्योग विभागामार्फतही यासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या सप्ताहामुळे शहरी भागासह ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. कृषी, आरोग्य, पाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा अशा विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळाले आहे.

शिवाय त्यांना आपले प्रॉडक्ट उद्योजक आणि शासनासमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याने इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कौशल्य विकास विद्यापीठ, आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

अशा विविध उपक्रमांमधून तरुणांमधील व्यावसायिकता, उद्योजकतेला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका सांगितली. तरुणांच्या बदलत्या आशा-आकांशांना चालना देणे तसेच त्यांच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शासन यंत्रणेत वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. तरुणांचाही शासनासमवेत भागीदारी करण्यामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजक, गुंतवणुकदारांनाही नवनवीन संकल्पना मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, फार्मइजीचे सहसंस्थापक डॉ. धवल शाह, हंड्रेड एक्स डॉट व्हीसीचे संस्थापक संजय मेहता, एसीटी ग्रँटस्चे प्रवक्ते संदीप सिंघल, आयएमसीचे माजी अध्यक्ष राज नायर यांच्यासह सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रातील इलिमिनो किड्स एलएलपी, हेसा टेक्नॉलॉजीज, रिझरव्हॉयर न्युरोडायव्हर्सिंटी कन्सलटंट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले.

तसेच प्रशासन क्षेत्रातील सीव्हीस, डेफिनिटीक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स, प्रानटेक मीडीया, कृषी क्षेत्रातील आर्यधन फायनान्शियल सोल्युशन्स, ग्रामहीत, क्रुशक मित्र ॲग्रो सर्व्हीसेस, शापोज सर्व्हीसेस, आरोग्य क्षेत्रातील ब्लॅकफ्रॉग टेक्नॉलॉजीज, हेल्थ व्हील्स, पेरीविंकल टेक्नॉलॉजीज, विंडमिल हेल्थ टेक्नॉलॉजीज, शाश्वत पायाभूत सुविधा आणि मोबीलिटी क्षेत्रातील ग्राउंड रिॲलिटी एन्टरप्राईजेस, क्यूईडी ॲनॅलिटीक्स, स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्स, योटाका सोल्युशन्स, शाश्वतता क्षेत्रातील आय कॅपोटेक, मॅकलेक टेक्निकल प्रोजेक्ट लॅबोरेटरी, पक्षीमित्र पोल्ट्री टेक्नॉलॉजीज, सोलीनास इंटिग्रीटी तर इतर क्षेत्रातील जेएचकेपी टेक्नॉलॉजीज, नेचर डॉट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले.