अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरुन नेले असल्याची तक्रार देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, माजी नगरसेवक आप्पासाहेब कोहकडे यांनी केली होती.

तर देवळाली प्रवरातील तरुण कुमार भिंगारे व माऊली भागवत यांनी महसुल मंत्री थोरात यांच्या घरावर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख विभाग या खात्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोजमाप केले.

गेल्या अनेक वर्षापासून कारखान्याच्या देवळाली रस्त्याच्या बाजूने असलेल्या जमिनीतून मुरूम व खडी मोठ्या प्रमाणात चोरून नेण्यात आली. मात्र कोणताही गवगवा व बोभाटा झालेला नव्हता.

नगराध्यक्ष सत्यजित कदम, अमृत धुमाळ, आप्पासाहेब कोहकडे तसेच देवळाली येथील कुमार भिंगारे व माऊली भागवत यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी महसूल खात्याला लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमि अभिलेख विभाग यांनी संयुक्तरीत्या घटनास्थळी जाऊन मोजमाप केले.

मोठ्या प्रमाणात अवाढव्य खड्डे पाडून मुरूम व खडी नेण्यात आल्याचे उघडकीस आले. एवढी मोठी घटना घडत असताना कारखाना व्यवस्थापन व परिसरातील नागरिकांना याची पुसटशीही माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगनमताने मुरूम व खडी चोरट्या पद्धतीने नेली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर कोणा विरुद्ध गुन्हा दाखल केला जातो याकडे लक्ष लागले असून प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश कंगनकर, सचिन गाजुल, स्थापत्य सहाय्यक अभियंता प्रवीण काळे, भुमापक धनंजय राऊत, सचिन भारस्कर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत मोजमाप केले.