अखेर नारायण राणे यांना अटक ! Narayan Rane arrested

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली.

त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक केली.

नारायण राणेंना दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली.

दिवसभरापासून नारायण राणेंच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती.ज्यानंतर हाय व्होलटेज ड्रामा झाला आणि अखेर राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, राणे समर्थकांकडून अद्यापही अटकेच्या वृकत्ता दुजोरा दिला जात नसून, त्यांना ताब्यात घेतल्याचंच ते म्हणत असल्याचं दिसत आहे.

नारायण राणे यांच्यावर रत्नागिरीत कारवाई होईल, रत्नागिरी पोलीस हे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करतील आणि प्रकरण नाशिक पोलिसांकडे वर्ग करुन नाशिक पोलीस त्यांना कोर्टात हजर करतील, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती.

वैद्यकीय तपासणी केली असता नारायण राणेंचे ब्लड प्रेशर आणि शुगर वाढल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. त्यानंतर जवळपास तासाभराच्या ताणाताणीनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली.

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात राणेंना कोर्टात घेऊन जाण्यात आले.