file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या राज्यात सुरु आहे. आता नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा.अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही.

आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे’. अशा शब्दात नारायण राणेंनी अजित पवारणावर निशाणा साधला आहे. दरम्यान नुकतेच राणे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत राणेंवर खोचक टीका केली होती.

पवारांच्या या टीकेला आता नारायण राणे यांनी त्यांच्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधत टीका केली.

तसेच जुने उल्लेख करत शिवसेना घडवण्यात आपलाही हात असल्याचे म्हटले. ‘माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहतात अर्थखातं पैसे देणार,’ असे उत्तर नारायण राणेंनी दिलं. ‘तुमच्या तिजोरीत पैसा आहे का?

अतिवृष्टीसाठी पैसे नाहीत. पुराचा फटका बसेलल्यांना एक रुपयाची मदत नाही. शेतकरी, सरकारी कर्मचारी यांना मदत नाही. एसटी कामगारांना पगार नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही याची चिंता करा पवारसाहेब’. असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे.