“मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे, घोड्यावरही बसले आहेत”; यूपीएच्या अध्यक्षपदावरून अनिल बोंडेंची शरद पवारांवर खोचक टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती : सध्या राज्यात यूपीएच्या अध्यक्षपदावरून (President of the UPA) जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावरूनच भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

अनिल बोंडे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली. मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे. घोड्यावरही बसले आहेत. आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारतील का..? असा खोचक प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे.

यूपीएच्या कोणत्याच घटकांनी शरद पवार यांना आमंत्रण दिले नाही. प्रस्तावही दिला नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) पोरांना हाताशी धरलं.

स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि टाळ्याही वाजवल्या असा खोचक टोलाही त्यांनी पवारांना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या (Congress) नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, नाना पटोले हे शरद पवारांना स्वीकारणार का, असा प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला.

ममता बॅनर्जी, प्रशांत किशोर यांच्या मार्फत फिल्डिंग लावून काहीही करून मला नवरदेव करा, असंच काहीस शरद पवारांच म्हणणंय. काहीही करून 80 व्या वर्षात मला नवरदेव करा अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोणी काही म्हणो वा न म्हणो, मान न मान मैं तेरा मेहमान या म्हणी प्रमाणे शरद पवारांनी स्वतःची आरती ओवाळून घेतली आहे. शरद पवारांनी खूप प्रयोग करून पाहिले. गोव्यात ते नोटाच्या पलीकडे पोहचू शकले नाहीत.

ममता बॅनर्जी, मुलायमसिंगसह इतर नेत्यांसोबत शरद पवार कशी मोट बांधतात हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसशिवाय मोट बांधतील का हेही पाहावे लागेल असेही अनिल बोंडे म्हणाले आहेत.