शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणेहेतू ‘या’ जिल्ह्यासाठी 2 कोटी 79 लाखाची मंजुरी, प्रशासनाचे अर्ज करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Parbhani News : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करणे हेतू प्रोत्साहित करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. खरं पाहता, मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदानाचे प्रावधान आहे. मात्र, या योजनेअंतर्गत असलेल्या जाचक अटीमुळे बहुतांशी शेतकरी बांधव फळबाग लागवड अनुदानापासून वंचित राहतात.

यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी निधीची तरतूद शासनाकडून केली जात आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी दोन कोटी 79 लाखांची निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत इच्छुक शेतकरी बांधवांना 30 तारखेपर्यंत अनुदानाचा लाभ घेणे हेतू अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधव 30 तारखेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत यंदाच्या वर्षासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी २ कोटी ६७ लाख ८९ हजार रुपये आर्थिक लक्षांक प्राप्त झाला असून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १० लाख ३२ हजार रुपये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १ लाख ३४ हजार रुपये एवढा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. म्हणजेच परभणी जिल्ह्यासाठी सर्व प्रवर्गातील एकूण २ कोटी ७९ लाख ५५ हजार रुपये एवढा आर्थिक लक्षांक प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत फळबागेसाठी खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड करणे,पीक संरक्षण, नांग्या भरणे व ठिबक सिंचनाव्दारे पाणी देणे या बाबीकरीता १०० टक्के अनुदान अनुज्ञेय करण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यास तीन वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० प्रमाणे संबंधित अनुदान अदा करण्यात येणार आहे. म्हणजे एकूण तीन टप्प्यात संबंधित पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तसेच फळबाग लागवडीकरीता किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा या योजनेअंतर्गत घालून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अपडेटेड ७-१२ उतारा आणि ८-अ उतारा
  • सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करावे
  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक खाते तपशील
  • कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी या लिंबुवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल कागदपत्राबरोबर अपलोड करावा लागणार आहे.

कोणत्या फळ पिकांसाठी अनुदान मिळणार

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू यांसारख्या एकूण 16 फळबाग पिकांसाठी अनुदान अनुदान अनुज्ञय करण्यात येणार आहे. या योजनेबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक शेतकरी बांधवांना कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे.