file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- शहरासह उपनगरातून दुचाकींची चोरीकरणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीच्या सहा दुचाकींसह दोन लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नगर शहरासह, उपनगर व नगर ग्रामीण भागातून दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. यामुळे दुचाकी चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नगर शहरात दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू केला. पथकाने नागरदेवळे येथील तिघांसह भिंगारच्या मोमीमपुरातून एकाला अटक केली. दिलीप दत्तात्रय शिंदे (वय 26), प्रफुल्ल गजानन गांगेकर (वय 30), खलील बालम शेख (वय 45 तिघे रा. नागरदेवळे ता. नगर),

अमजद हुसेन शेख (वय 45 रा. मोमीनपुरा, भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार अक्तार जहूर अहमद शेख (रा. गवळीवाडा, भिंगार) हा पसार झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी या दुचाकी नगर शहरातील तारकपूर बस स्थानक, रेल्वे स्टेशन पार्किंग, गुलमोहर रोड, नेता सुभाष चौक, गोविंदपुरा, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून चोरल्या असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.