अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- गांजा विक्रीसाठी आलेल्या जामखेड येथील दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून 150 किलो गांजा, कारसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित दोन महिला मात्र पसार झाल्या आहेत. किरण आजिनाथ गायकवाड (वय 29 रा. मिलिंदनगर, ता. जामखेड) व मौलाना सत्तार शेख (वय 27 रा. तपणेश्वर रोड, हाडोळा, ता. जामखेड) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी गावातील परीटवाडी येथे कारमधून दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक मांडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, शुभांगी कुटे, पोलीस कर्मचारी संतोष औटी, वैभव मोरे, विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे, भाग्यश्री जाधव, उमेश कुतवळ, विजय शिंदे, मनीषा घुले यांच्या पथकाने परीटवाडी येथे जाऊन संशयित कार पकडली.

त्यात 150 किलो गांजा मिळून आला. पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार किरण आजिनाथ गायकवाड व मौलाना सत्तार शेख या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.