अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- एसटी बसस्थानकात फक्त एसटी बस येणे अपेक्षित असले तरी, कोणीही चालक आपले खासगी वाहने घेवून येतात. स्थानकामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने कितीही वेळ लावलेल्या दिसतात.

अगदी ‘नो पार्किंग’ लिहिलेल्या फलकासमोरही खासगी वाहने लावलेली दिसतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर बसस्थानकात आढळून येत आहे. अनेकदा चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वारासमोरचच उभी करतात.

त्यामुळे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बसला अडथळा निर्माण होऊन अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. पुणे, नाशिक, मुंबई या बड्या शहरांच्या मध्यावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. नव्याने संगमनेर बसस्थानक आणि व्यापारी संकुल बांधण्यात आले.

व्यापारी संकुलासमोर काही प्रमाणात वाहने उभी राहतील, अशी पार्किंगची सोय आहे. मात्र, तरीही बसस्थानकाच्या आवारात मोठ्या संख्येने खासगी दुचाकी, चारचाकी वाहने नेहमीच उभी असतात. काही वेळा तर ज्या ठिकाणी ठराविक गावी जाणारी बस उभी राहते त्याच ठिकाणी अनधिकृत वाहने उभे राहत असल्याने

एसटी चालकास बस लावण्यास अडचण होत असून प्रवाशांनाही आपली बस कुठे लागली याची कल्पना येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते. तर अनेक वाहनचालक आपली वाहने बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करतात. त्यामुळे स्थानकात जाणाऱ्या अथवा बाहेर पडणाऱ्या बसला अडथळा होतो.

बसचालक हॉर्न वाजवून वैतागून जातात. अखेर चालकालाच बस मागे घेऊन वळवून नेण्याशिवाय पर्याय नसतो. बसस्थानकाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ भुयारी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने पार्किंग असूनही त्याचा वापर होत नाही.

येथे पार्किंग सुरू केल्यास रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहनकोंडीचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुठूनही कशाही प्रकारे येणाऱ्या या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून याबाबत प्रवाशीसुद्धा त्रस्त झाले आहेत.

तरीही या स्थानकातून ये-जा करणारी तसेच अनधिकृतपणे लावलेली व चालकांविरुद्ध बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक किंवा पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.