संपत्तीच्या विषयी बऱ्याचदा आपण ऐकतो किंवा साधारणपणे चर्चा असते की पालकांच्या संपत्तीवर मुलांचा आणि मुलीचा किती अधिकार असतो? याबाबत देखील कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या वाटपावरून वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे बरेच पालक मृत्युपत्राच्या माध्यमातून मुलांमध्ये संपत्तीचे योग्य पद्धतीने वाटप करतात. परंतु या उलट मुलांच्या संपत्तीवर अथवा मालमत्तेवर आई-वडिलांचा अधिकार असतो का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या लेखात कायदा काय म्हणतो? किंवा कशा पद्धतीने कायद्यामध्ये याबद्दल तरतूद करण्यात आली आहे? याबद्दल महत्वाची माहिती घेऊ.
मुलांच्या मालमत्तेवर पालकांचा अधिकार असतो का?
पालक म्हटले म्हणजे स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणारे आणि मुला मुलींचे आयुष्य सुखी व्हावे याकरिता आयुष्यभर कठोर परिश्रम करतात. कालांतराने मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्याकडून देखील संपत्तीची किंवा मालमत्तेची उभारणी केली जाते.
परंतु बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की मुला-मुलींच्या संपत्तीची ओढ ही पालकांना नसते. परंतु तरीदेखील मुलांच्या मालमत्तेवर पालकांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. यामध्ये कशा पद्धतीने मुलांच्या मालमत्तेत पालकांचा वाटा असू शकतो याची महत्वाची माहिती देखील कायद्यात आहे.
याबाबतीत कायदा सांगतो…..
जर आपण हिंदू उत्तर अधिकारी कायद्याचा विचार केला तर त्यानुसार मुलाच्या मालमत्तेत पत्नी, मुले आणि आई हे पुरुषांच्या संपत्तीमध्ये प्रथम श्रेणीचे वारस असतात.
समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिची संपत्ती प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये वाटली जाते. मृत झालेल्या व्यक्तीच्या नंतर त्याच्या मागे आई, पत्नी आणि मुले असतील तर संबंधिताच्या मालमत्तेची वाटणी तिघांमध्ये सारख्या पद्धतीने करण्यात येते.
जर याबाबत आपण रियल इस्टेट कंपनी मॅजिक ब्रिक्सच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते पालकांचा त्यांच्या मुलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार नसतो. परंतु जर मुलाचा अकाली मृत्यू झाला आणि संबंधित व्यक्तीने मृत्युपत्र केले नसेल तर पालक त्यांच्या मुलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतात.
याबाबत हिंदू उत्तर अधिकारी कायद्याच्या कलम आठ मध्ये मुलाच्या मालमत्तेवर पालकांचा हक्क स्पष्ट करण्यात आला असून त्यानुसार आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस असते तर वडील मुलाच्या मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात.
अशामध्ये आईला प्रथम प्राधान्य दिले जाते परंतु प्रथम श्रेणी वारसाच्या यादीमध्ये जर कोणीही व्यक्ती नसेल तर दुसरे वारस म्हणून वडिलांना संबंधित मालमत्तेचा ताबा मिळू शकतो.
विवाहित आणि अविवाहित मुलांसाठीचे वेगवेगळे नियम
जर आपण याबाबत कायद्याचा विचार केला तर मुलाच्या मालमत्तेवर पालकांचा हक्क आहे का या विषयांमध्ये लिंग महत्वाची भूमिका पार पाडते. समजा मृत झालेली व्यक्ती पुरुष असेल तर त्याचे मालमत्ता वारस त्याची आई आणि दुसरे वारस म्हणजे त्याच्या वडिलांना हस्तांतरित केली जाते परंतु जर आई हयात नसेल तर मालमत्ता वडील व त्याच्या सहवारसांना हस्तांतरित केली जाते.
परंतु संबंधित मृत व्यक्ती लग्न झालेला मुलगा असेल आणि त्यांनी मृत्युपत्र लिहिले नसेल तर अशा स्थितीमध्ये त्याची पत्नी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार मालमत्तेचा वारस ठरते.
अशा परिस्थितीमध्ये संबंधित मुलाची पत्नी प्रथम श्रेणी वारस म्हणून तिची गणना केली जाते आणि तिला पतीची मालमत्ता इतर कायदेशीर वारसांसोबत समान वाटून दिली जाते.
या उलट जर मृत्यू झालेले महिला असेल तर कायद्यानुसार मालमत्ता प्रथम तिच्या मुलांना आणि पतीला आणि दुसरे तिने निवडलेल्या वारसांना हस्तांतरित केली जाते आणि शेवटी तिच्या पालकांना हस्तांतरित केली जाते.