अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सवयींचा पती-पत्नीच्या सहजीवनावर आणि नात्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे दोघांचीही रोजची दैनंदिनी कशी असावी, काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे याचा विचार दोघांनी शांत बसून आणि सकारात्मक पद्धतीने करण्याची गरज असते.

ही दैनंदिनी अशा पद्धतीने प्लॅन करण्याची गरज असते की जणू काही संसार हा तुमच्यासाठी दुसरा निसर्गच आहे, असे वाटले पाहिजे.

त्यासाठीच्या काही टिप्स :- समान आवडी जोपासा :- जेव्हा एकमेकांबद्दल वाटणारी ओढ व्यावहारिक पातळीवर येते तेव्हा तुमच्या दोघांमधील समान आवडी काय आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. अशा आवडी जोपासणे आणि दोघांनी त्याचा एकत्रित आनंद घेण्यातून नाते आणखी फुलत जाते, घट्ट होते.

तुम्ही दोघे एकत्रित आनंद घेऊ शकता अशा गोष्टींचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व कधीही कमी करू नका. मग संगीताचे कार्यक्रम, नाटक-सिनेमा, खाद्यपदार्थ बनवणे, फिरायला जाणे, विविध कला-छंद अशा ज्या तुमच्या दोघांच्या समान आवडी असतील त्या आणखी जोपासा. त्याचवेळी स्वतःच्या वैयक्तिक आवडी जोपासायला अजिबात विसरू नका.

त्यामुळे तुमच्या जोडीदाराला अधिक आनंदी वाटेल आणि प्रत्येक गोष्टीवर आपण कुणावर तरी अवलंबून नाही याचेही दोघांना समाधान आणि आनंद मिळतो.

चांगल्या गुणांना प्रोत्साहन :- आनंदी जोडप्यांमध्ये दिसणारा आणखी एक गुण म्हणजे जोडीदाराचे कुठे चुकते आहे, यावर नजर ठेवण्यापेक्षा त्याच्याकडून चांगल्या गोष्टी काय घडल्या आहित, घडत आहेत आणि त्या गोष्टींना प्रोत्साहन कसे द्यायचे हा विचार आनंदी जोडपी नेहमी करत असतात.