अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

याच घटनेचा निषेध म्हणून कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने एकदिवसीय काम बंद आंदोलन करून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी आयोजित निषेध सभेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, कर्तव्य बजावत असताना महिला अधिकार्‍यांवर भ्याड वृत्तीने हल्ला होणे ही निंदनीय बाब आहे. दुर्दैवाने त्यांच्या हाताची बोटे तुटली.

या घटनेचा महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेच्यावतीने निषेध करतो. प्रामाणिकपणे कार्य बजावत असतानाच ही घटना घडली.त्यामुळे हे हल्ले महिलांच्या प्रगतीवर होत आहे.

या हल्ल्याची तमा न बाळगता आमची सेवा बजावत राहणार. हा हल्ला महिलेवर झालेला हल्ला नसून संपूर्ण कर्मचार्‍यांच्यावर झालेला असून याचा निषेध आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणार्‍या अधिकार्‍यावर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते.

त्यामुळे अशा हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. सदरील गुन्हेगारावर कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

या घटनेचा जाहीर निषेध म्हणून कोपरगाव नगरपरिषदेचे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण कामकाज कडकडीत बंद करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.