अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- स्वातंत्र्यवीर सावरकर हे समग्र, स्वाभीमानी हिंदू राष्ट्रासाठी आग्रही होते. प्रत्येक घरातून एक जण सैन्यात जायला हवा असे ते सांगायचे. ते जाज्वल्य, देशभक्त क्रांतीकारी नेते होते. त्यांना आपण समजू शकलो नाही हे आपले दुर्देव आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेशी साधर्म्य साधणारी जातीविरहित समाज रचनाच सावरकरांनाही अभिप्रेत होती. समग्र, एकात्म व सर्वसमावेशक हिंदुत्त्व हे त्यांचे वैचारिक चिंतन देशाला जोडणारे होते व आजही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत नाशिक येथील प्रा.संजय साळवे यांनी व्यक्त केले.
जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सामाजिक आणि राजकीय चिंतन’विषयावर सातवे व व्याख्यानमालेचे अखेरचे पुुष्प गुंफताना प्रा.साळवे बोलत होते.
या व्याख्यानमालेचे यंदा ११ वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे. हिराकांत रामदासी यांनी स्वागत केले. शांतीभाई चंदे, वाल्मिक कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
शतानंद कडेढोणकर यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेचा व जनजाती कल्याण आश्रमच्या कार्याचा आढावा घेतला. संजय लोळगे यांनी व्याख्याते प्रा.संजय साळवे यांचा परिचय करून दिला. राजश्रीताई गंधे यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत सादर केले.
प्रा.साळवे विवेचन करताना म्हणाले की, १९२४ साली सावरकरांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली व त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द करण्यात आले. त्याचकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला सत्याग्रह केला. सावरकर समस्त हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम करत होते.
रत्नागिरीत त्यांनी पतित पावन मंदिराची बांधणी केली. रत्नागिरीत अनेक मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी चळवळ सुरु केली. याच काळात कॉंगे्रसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर झाला. हिंदू महासभेतही असाच ठराव मंजूर झाला.
हिंदू समाजाला समरसतेचे, अस्पृश्यता निवारणाचे आवाहन सावरकरांनी कायम केले. आज देशभरात परिस्थिती पाहिली तर विघटनकारी शक्ती जोमाने काम करीत आहे. देश एकसंघ राहण्यासाठी सावरकरांच्या विचारांचे चिंतन अतिशय अतिशय आवश्यक आहे.
त्यांनी जो जो सावधगिरीचा सल्ला दिला, द्रष्टेपण दाखवले त्यावर खोल विचार करणे गरजेचे आहे. २३ जून १९५३ साली सावरकरांनी काश्मिर प्रश्नावर पंडित नेहरूंना सावधगिरीचा इशारा दिला होता. तो किती योग्य होता हे आजही कळून येते.
त्यांनी सैनिकीकरण, धर्मांतर, हिंदू राष्ट्र, अस्पृश्यता निवारण, विज्ञानधर्माची कास धरावी, यंत्रयुगाचे महत्त्व, वेळप्रसंगी धर्मग्रंथांचे दास्यही झुगारुन द्यावे असे अनेक विषय मांडले. १९६२ च्या युध्दात चीनने भारताचा प्रभाव केला.
तेव्हा एका अस्वस्थेतून सावरकरांनी पंडित नेहरूंवर टिका केली. त्यांचा आंतरराष्ट्रीय विषयावरील भूमिका भारताला सुसज्ज बनवण्यासाठीच होती. त्यांनी देशाचे सामरिक सामर्थ्य वाढवून शांततापूर्ण सहजीवनाची मांडणी केली.
परराष्ट्र धोरणाबाबत त्यांनी केलेली मांडणी आजही दिशादर्शक आहे. १९५३ ला त्यांनी जम्मू काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे सांगत देशात एकच घटना, एकच राष्ट्रध्वज हवा असा आग्रह धरला होता. कलम३७० हटवणे ही त्यांच्याच विचारांची प्रेरणा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मानव कल्याणासाठी राष्ट्रीय सभ्यतेचा अंगिकार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणायचे. धर्मांतर विषयावरही ते कायम सावधगिरीचा सल्ला द्यायचे. परकीय मिशनरींचे कार्य देशात जोरात चालू असताना त्यांनी शुध्दीकरण चळवळ राबविली.
कदाचित आंबेडकर व सावरकर एकत्र राहिले असते तर हिंदू समाजातील एक महत्त्वाचा प्रश्न कायमचा निकाली निघाली असता. कारण अनेक विषयांवर त्यांची परस्परपूरक भूमिका होती. सावरकरांचे डॉ.आंबेडकर यांच्या मांडणीबद्दल सकारात्मक मत होते.
डॉ.आंबेडकर घटना समितीत गेले याचे त्यांना खूप कौतुक होते. दहशतवादाच्या समस्येचाही सावरकरांनी त्याकाळातच उहापोह केला होता. दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर भारताने पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून दिले.
हिच निती सावरकरांना अभिप्रेत होती. त्यांची देशभक्ती ही सामाजिक समतेच्या मूल्यांशी जोडलेली होती. साहित्य, कला, परंपरेचा वारसा जतन करण्याबाबत ते आग्रही असायचे. देशाची प्रगती, सामाजिक सुधारणेविषयी त्यांनी कायम चर्चा केली.
ते समाज अखंड रहावा, एक रहावा, परस्परांना पूरक रहावा अशाच हिंदुत्त्वाची मांडणी करतात. आज सावरकरांवर टिका करणारांनी समग्र सावरकर समजून घेतले तर ही टिका नक्कीच थांबेल. विशारद अशोकराव पेटकर यांनी व्याख्याते मा.संजय मालपाणी,ले.ज.दत्तात्रय शेकटकर, माधव भंडारी,डॉ. मधुकर आचार्य, किरण शेलार व विनायकराव देशपांडे,
प्रा.संजय साळवे यांच्यासह देणगीदार स्वानंद डायनिंग हॉल,दौंड,पोलाद स्टील,जालना,आनंद ट्रेडिंग कं.नगर,बाबा डेव्हलपर्स,नगर,आकांक्षा सेल्स कॉर्पोरेशन, नगर तसेच फेसबुक लाईव्ह व प्रसिद्धी विभाग पाहणारे वैभव घोडके, जितेंद्र अग्रवाल व विविध वर्तमानपत्रे व त्यांचे बातमीदार,
गीत सादर करणारे शेखर कुलकर्णी व त्यांचे सहकारी ,व्याख्यानमाला प्रमुख शेखर भावे,मार्गदर्शक रवींद्र तथा राजाभाऊ मुळे व सर्व रसिक श्रोते यांचे विषयी ऋण व्यक्त केले तसेच आभारही मानले.. शेवटी पसायदानाने व्याख्यानाची सांगता झाली. उपक्रम यशस्वीतेसाठी जनजाती कल्याण आश्रम पदाधिकारी, कार्यकर्ते ,हितचिंतक यांनी अथक परिश्रम घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम