अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात एकूण ३८ शिवभोजन थाळी केंद्रावर पाच महिन्यात ७ लाख ५१ हजार ६०० थाळ्यांचे वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

दरम्यान कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागलीय. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

कोरोना काळात शिवभोजन थाळीची सुरुवातीची किंमत 10 रुपये ठेवण्यात आली होती. कोरोना काळात नंतर ती 5 रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली होती.

१५ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच जिल्ह्याच्या इष्टांकात दीड पट वाढ करण्यात आली होती.

जिल्ह्याला दैनंदिन ६९०० थाळ्यांचा इष्टांक होता. तेवढ्या थाळ्या रोज वितरित करण्यात येत आहेत. १५ एप्रिल २०२१ ते २६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्राद्वारे ७ लाख ५१ हजार ६०० थाळ्या वाटप करण्यात आल्या होत्या, असे माळी यांनी सांगितले. सध्याही या थाळ्या नि:शुल्क वितरित करण्यात येत असल्याचे माळी यांनी सांगितले.