file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- राज्यात रोज दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांची समोर येणारी संख्या ही नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येते आहे.

राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे.

शिवाय, तिसऱ्या लाटेचा धोका देखील तज्ज्ञांकडून वर्तवला गेलेला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे.

दरम्यान, काल दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.

तर, १०४ करोनाबाधित रूग्णांचा राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७३१३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.