file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हा सध्या एकच उपाय दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी लसीकरण केंद्राबाहेर वाढू लागली आहे.

यातच अनेक ठिकाणी वशिलेबाजी व राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे वादजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात झालेला आढळून येऊ लागला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावरील वशिलेबाजी तातडीने थांबवा आणि काष्टी गावातील नागरिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी काही तरुणाईने एकदिवसीय उपोषण केले.

काष्टी गावची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. कोरोना प्रतिबंधक लस अवघ्या तीन हजार नागरिकांना देण्यात आली आहे. इतर गावांच्या तुलनेत काष्टी गाव लसीकरणात मागे आहे. त्यातच येथे वशिलेबाजी होत असल्याने सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही.

काष्टी गावासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे स्वतंत्र शिबिर आयोजित करावे, टोकन सिस्टमनुसार लस देण्यात यावी, अशी मागणी राकेश पाचपुते यांनी केली.