तुमचे आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  तुम्ही सुरू केलेले आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काशीनाथ दाते यांनी दिल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी केला, तर आपण अशी धमकी दिली नसल्याचे स्पष्टीकरण सभापती दाते यांनी दिले आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी; अन्यथा आमची बदली करावी, या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी काशीनाथ दाते, रामदास भोसले यांनी तहसीलदार ज्योती देवरेंची भेट घेत माहिती घेतली.

त्यानंतर दाते यांनी महसूल कर्मचाऱ्यांचे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन तुम्ही आंदोलन मागे घ्या, तालुक्यात असा प्रकार झाला नाही, नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी दिली, असा महसूल संघटनेने आरोप केला आहे.

या प्रकाराने महसूल कर्मचारी संतप्त झाले असून, आमच्यावर अशा पद्धतीने दबाब आणू नये, अशी भूमिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक रोकडे, तलाठी संघटना अध्यक्ष यू.एस. मांडगे यांनी सांगितले. दरम्यान आपण महसूल कर्मचारी आंदोलकांना कोणतीही धमकी दिली नाही.

तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांमधील वादात जनता भरडली जाऊ नये यासाठी वाद मिटवा अन्यथा तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांच्याही बदलीची मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत, असे दाते म्हणाले.