अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीला स्मशान भूमित जाळण्यास विरोध करुन मयताच्या प्रेताची जाणून-बुजून विटंबना करणार्‍या प्रकरणातील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन

त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व संबंधित पोलिस, शासकीय अधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी शाहू, फुले, आंबेडकरवादी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर घटनेचा निषेध नोंदवून, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाकार्याध्यक्ष सुनिल सकट, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम विचार मंचचे अशोक शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदिप ससाणे, काँग्रेस कमिटीचे नगर तालुकाध्यक्ष गणेश ढोबळे, सतीश बोरुडे, आरपीआय गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के,

लोकशाहीर अण्णाभाऊ व शाहीर अमर शेख कला संस्थेचे भगवानराव मिसाळ, सामाजिक कार्यकर्त्या उषाताई शिंदे आदी उपस्थित होते. बोरगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मातंग समाजातील अंध व्यक्ती धनाजी साठे यांच्या निधनानंतर त्यांचे प्रेत स्मशान भूमित जाळण्यास जातीय कारणातून गावगुंडांनी विरोध केला.

मयताच्या प्रेताची जाणून-बुजून विटंबना करण्यात आली. सदर प्रकरण संबंधित पोलिस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कोतवाल यांनी व्यवस्थित न हाताळल्याने सामजबांधवांना हिनतेची वागणुक मिळाली आहे. सदर पोलिस व शासकीय अधिकारी यांचे निलंबन करण्यात यावे.

तसेच गावगुंडांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा स्वरूपाची घटना महाराष्ट्रात घडल्यास सर्व समाजबांधव विरोध करणार्‍याच्या घरासमोर मयताचे सर्व अंत्यविधी करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.