file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  नगर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गावरान कांद्याची आवक सुरू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत अचानक भाव दोन हजारांच्या आत आल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा चाळीमध्ये भरून ठेवला होता.

मागील आठवड्यात कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे ठेवणीतला कांदा शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणला, परंतु भाव घसरल्यामुळे चिंता वाढली. शुक्रवारी राहुरी बाजारात २०० ते १९०० पर्यंत भाव मिळाला होता, तर रविवारी अवघा १७५० एवढाच भाव मिळाला.

भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आता भर पडली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर घसरत असल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. कांदा बियाणांचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला. त्यात आता कांद्याचे दर घसरल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.