अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- आगामी निवडणुकी लक्षात घेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुकास्तरावर मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसून येऊ लागले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यासाठी महसूलमंत्री खुद्द या मैदानात उतरले आहे.

श्रीरामपूर पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर शहर भकास करून ठेवले. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व श्रीरामपूरची नगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात आलीच पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

ना. बाळासाहेब थोरात श्रीरामपूर दौर्‍यावर आले असता शहरातील नगरसेवक, माजी नगरसेवक व ज्येेष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी नगरसेवकांनी श्रीरामपूर शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करून, पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर शहर कसे भकास करून ठेवले व पालिकेतील भ्रष्टाचार याबाबत सत्ताधार्‍यांच्या कार्यपध्दतीचा पाढाच वाचला.

श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवणार असल्याची ग्वाही देऊन सर्व ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी आपापली मते मांडून आगामी पालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला. यावेळी ना. थोरात यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.