file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बूथ हॉस्पिटल ते ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली.

त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला असून, या मार्गावरील कच ही उचलून घेण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठांपाठोपाठ आता शासकीय कार्यालयाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

छोटी-मोठी दुकाने, टपर्‍यांसह वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह बहुतांश शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपर्‍यांची अतिक्रमणे झाली असून दुचाकी चालक आपली वाहने रस्त्यावरच आडवीतिडवी उभी करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे.

शहरातील अतिक्रमणे हा गांभीर्याचा विषय बनला आहे. यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटाव मोहीम सुरू केली आहे. या पथकाने कापड बाजार येथील घास गल्लीतील अतिक्रमणे हटविली आहे. दोन दिवसांपासून या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे.

त्यामुळे हा रस्ताही मोकळा झाला आहे. दरम्यान उद्योग खाणीकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे आज शनिवारी नगर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविण्यात आली आहेत.

तसेच या मार्गावरील टपऱ्या ही हटविण्यात आल्या. जिल्हाधिकारी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर टाकलेली कच ही शुक्रवारी जमा करून घेण्यात आली आहे.