आर्थिक डबघाईला आलेल्या मनपाने बाकड्यांवर खर्च केले 24 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमनगर महानगर पालिकेचा अजबच कारभार सध्या पाहायला मिळतो आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट ओढवले असून मनपाच्या एका कारनाम्यामुळे मनपा सध्या चर्चेत आणि टीकेच्या स्थानी आली आहे.

मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना बाकड्यांवर तब्बल २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसाठी ४८० बाकडी खरेदी करण्यात आली असून, अन्य पदाधिकारी नगरसेवकांची बाकड्यांची मागणी आहे.

सर्वसामान्य नागरिकांकडून कर रुपाने वसूल करण्यात आलेल्या पैशांची उधळपट्टी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या पुरवठा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सिमेंटची ४८० बाकडी खरेदी करण्यात आली आहेत. एका बाकड्यासाठी पालिकेला ५ हजार २०० रुपये मोजावे लागले.

बाकड्यांसाठी एकूण २४ लाख रुपये खर्च झाला आहे. याशिवाय अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनीही बाकड्यांची मागणी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आणखी बाकडी खरेदी केले जाणार आहेत. यापूर्वीही शहरात ठिकठिकाणी बाकडी बसविण्यात आली असताना नव्याने बाकडी बसवू नयेत.

पूर्वीच्या बाकड्यांचे सर्वेक्षण करून माहिती घ्यावी. बाकडे बसविल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बाकड्यांवर बसून रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगतात. त्यातून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात.

असे असताना पदाधिकाऱ्यांकडून बाकडी बसविण्याचा फार्स केला जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने यापूर्वी करण्यात आला आहे. बाकड्यांबाबत मनसेने केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवित आयुक्त शंकर गोरे यांनी बाकडी खरेदीला हिरवा कंदील दाखविला आहे.