अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वाघापूरहून संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला केला. यावेळी पाठीमागे बसलेली महिला जखमी झाली आहे.

दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी पळविल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी कि, विनोद नामदेव बनसोडे, राहुल रंगनाथ रोहम,

छाया विनोद बनसोडे हे तिघे जण दुचाकीवरून जात असताना अंकुर रोपवाटिकेजवळ अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला.

यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या छाया बनसोडे यांच्या मांडीवर पिशवी असल्याने बिबट्याचा अंदाज चुकला. मात्र त्याच्या पंजाने त्यांना मोठी दुखापत झाली.

दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकी जोरात पळविल्याने मोठी घटना टळली. तालुक्यात बिबट्यांचे माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बागायती शेतात लपण्यासाठी जागा मिळत असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान संबंधित परिसरात पिंजरा बसवण्यात यावा व बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहे.