अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  युथ गेम्स नॅशनल चॅम्पियनशिप फेडरेशनच्या माध्यमातून दिल्ली येथे झालेल्या दोनशे मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विकास नवनाथ सायंबर या खेळाडूचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिलाष घुगे, भरत पवार, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, लहू कराळे, जितेंद्र बनकर, राहुल शर्मा, ओंमकार घोलप, सिध्दार्थ पाचारणे, दिपक वाबळे, संकेत सायंबर, महेंद्र खामकर, शुभम पोकळघट, गणेश पवार आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना काळात अनेक क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. सध्या हळूहळू सर्व खेळाच्या स्पर्धा सुरु होत आहे. पॅरालिम्पिकमध्ये देखील भारताच्या खेळाडूंची पदकांची कमाई सुरु आहे. खेळात करिअर घडविण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत असून,

गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी त्यांना खेळाच्या विविध सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याचे कार्य आमदार संग्राम जगताप व अरुणकाका जगताप करीत आहे.

शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू विविध खेळात नैपुण्य मिळवीत असून, राष्ट्रीय खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळत असल्याने पालकांचा देखील खेळाबद्दल दृष्टीकोन बदलला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विकास सायंबर या खेळाडूस भावी वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.