file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- आयपीएलच्या(IPL) उर्वरित मोसमाला लवकरच सुरुवात होत आहे. आयपीएलच्या या मोसमामध्ये (२०२२) आठ ऐवजी दहा संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत.

बीसीसीआयकडून दोनपैकी एका नव्या संघासाठी टेंडर प्रकियेला सुरुवात करण्यात आली आहे. नव्या संघाच्या खरेदीसाठी मूळ किंमत २००० कोटी ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे आता बीसीसीआयच्या तिजोरीत चार ते सहा हजार कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात आठऐवजी दहा संघांचा समावेश असणार आहे हे आता निश्चित झाले आहे.

आयपीएलमधील संघ विकत घेणाऱया कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ३ हजार कोटी असायला हवे अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच एक संघ खरेदी करताना तीनपेक्षा अधिक कंपन्यांना एकत्र येता येणार नाही.

संघ खरेदी करण्यासाठी लावण्यात येणाऱया बोली कागदपत्रांसाठी इच्छुकांना १० लाख रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम परत केली जाणार नाही.

आयपीएलमधील संघासाठीच्या रेसमध्ये अहमदाबाद व लखनौ ही दोन शहरे प्रामुख्याने आहेत. तसेच अदानी ग्रुप व संजीव गोयंका ग्रुपमध्ये संघ खरेदी करण्यासाठी चुरस लागण्याची शक्यता आहे. शिवाय नागपूर, रायपूर, पुणे, विशाखापट्टणम व रांची ही शहरेही आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.