अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी आणि एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभा आणि समविचारी संघटनांनी केलीय.

या मागणीसाठी किसान सभेसह या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपूर बाजार समितीमध्ये आंदोलन केलं. शेतकरी नेते अजित नवले म्हणाले, “टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात.

महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे याचा तातडीने शोध घ्यावा. या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत.

टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना भावी काळात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून बाजार समित्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी,

टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकावीत, टोमॅटो पिकासाठी वापरली जाणारी कीटकनाशके, विषाणू विरोधी औषधे, पोषके व खते यांची किंमत वाढवून कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण केले जाते.

सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात शेतकर्‍यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा या मागण्या यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केल्या. किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामध्ये यावेळी परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.