अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कर्जत- श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहकरा नदीच्या पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील एका शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय १५ वर्षे) व विरेंद्र रामा हाके (वय १६ वर्षे, दोघे रा. मावळेवस्ती, ता. कर्जत) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील मावळेवस्ती येथील हरी नामदेव कोकरे व विरेंद्र रामा हाके हे दोन शाळकरी मुले सध्या शाळा बंद असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात गेले.

मंदिर परिसरात पुणे येथील चोपडा यांच्या शेतजमीनीत शेततळे आहे. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी हे दोघेही शेततळ्यात उतरले. परंतु त्यांना शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.