file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर दिल्लीगेट परिसरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जात आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील दिल्लीगेट परिसरात पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर साचत असून, ते तळघरातील अनेक दुकानांमध्ये घुसून नुकसान होत आहे.

त्यामुळे दुकानदारांनी साचलेल्या पाण्याचे पूजन करून व मेणबत्ती पेटवून महापालिका प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावरील खड्डेही पाण्याने तुडुंब भरले.

हे साचलेले पाणी अनेक दुकानांमध्ये घुसले. खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालक खड्ड्यात पडले आहेत. या सर्व परिस्थितीला महापालिकेचा गलथान कारभारच कारणीभूत ठरत आहे. दिल्लीगेट ते सिद्धीबाग ते न्यू आर्ट्स कॉलेज या रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झालेले आहे.

परंतु ड्रेनेजची कामे अर्धवट आहेत. सर्जेपुरातील खोकर नाल्यातून वाहून येणारे पाणी दिल्लीगेट परिसरात साचते. या पावसाच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून ‘जैसे थे’ च आहे. यामुळे मनपा प्रशासनाचा व्यावसायिकांकडून निषेध नोंदवण्यात आला.