विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही – आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- आश्‍वी आणि परिसरातील गावांमध्‍ये विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही, विकास प्रक्रीया राबवितांना पायाभूत सुविधांनाच प्राधान्‍य दिले त्‍यामुळेच या भागातील रस्‍ते विकासाला गती मि‍ळाली.

दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असलेल्‍या प्रवरा नदीवरील उंबरी बाळापूर ते शेडगाव या मोठ्या पुलाचे होत असलेले काम हे या भागातील दळणवळणासाठी महत्‍वपूर्ण ठरणार असून, याचा लाभ ग्रामस्‍थांसह सर्वच पक्षांना होणार असल्‍याचा टोला भाजपाचे नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लगावला.

उंबरी बाळापूर ते शेडगाव या गावांना जोडणा-या प्रवरा नदीवरील सुमारे ६ कोटी ५० लाख रुपयांच्‍या मोठ्या पुलाच्‍या कामाचे तसेच मतमाऊली तिर्थस्‍थानावरील सभा मंडपाच्‍या कामाचे भूमि‍पूजन माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भूसाळ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ.रोहिणी निघुते, पंचायत समि‍ती सदस्‍या दिपाली डेंगळे, पंचायत समि‍ती सदस्‍य गुलाबराव सांगळे, कैलास तांबे, डॉ.दिनकर गायकवाड, भगवानराव इलग, सरुनाथ उंबरकर, सौ.कांचनताई मांढरे, नारायणराव कहार, सरपंच संदिप घुगे, सरपंच अरुण भूसाळ, सचिन शिंदे आदि याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शाब्‍दीक कोट्या करुन विरोधकांचे नाव न घेता टिका केली.

या गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्‍यानंतर अनेकांनी आमच्‍या बद्दल शंका उपस्थित केल्‍या होत्‍या. परंतू कोणाच्‍याही लिप्‍ट बंद झाल्‍या नाहीत, ऊसाचे क्षेत्रही कमी झाले नाही उलट या भागातील रस्‍त्‍यांची आवस्‍था २५ वर्षांपुर्वी कशी होती हे सर्वांना माहीती आहे. आता वाड्या वस्‍त्‍यांपर्यंत रस्‍ते झाले, दळणवळणाची सुविधा निर्माण झाली. रस्‍ते विकासाचे जाळे निर्माण झाले. आत्‍तापर्यंत याभागात पाच मोठे पुल बांधण्‍यात सर्वांच्‍या सहकार्याने यश आले.

आता हा सहावा मोठा पुल मार्गी लागत आहे याचे मोठे समाधान असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आत्‍तापर्यंत प्रवरा नदीवरील पाच मोठ्या पुलांचे काम पुर्ण होवून यामार्गावरुन वाहतूकही सुरुळीत सुरु झाली. प्रवरा नदीवरील सहाव्‍या क्रमांकाचा हा पुल पूर्ण व्‍हावा यासाठी सातत्‍याने पाठपुरावा केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोकराव चव्‍हाण यांचेही यासाठी सहकार्य मि‍ळाले असा आवर्जुन उल्‍लेख करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, कोणतेही विकास काम हे राजकारण विरहीत असले पाहीजे. या पुलाचा लाभ यापुलाच्‍या कामामुळे उंबरी बाळापूर ते शेडगांव या दोन गावांसह अंभोरे, मालूंजे, पानोडी, शिबलापूर माळेवाडी, पिंपरणे, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रूक या गावांनाही या मोठ्या पुलाचा लाभ होणार आहे.

विकासाच्‍या रस्‍त्‍यांना राजकीय अभिनिवेश नसतो. त्‍याच पध्‍दतीने या पुलाचा लाभ भाजपासह महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनाही होणार असल्‍याचा टोला त्‍यांनी आपल्‍या भाषणातून लगावला. राजकारणामध्‍ये सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे लागते, काहीजन फक्‍त त्‍यांच्‍या राजकीय स्‍वार्थाकरीता येतात.

पण दायित्‍व मात्र स्विकारत नाहीत. कोव्‍हीडच्‍या काळात सात ते आठ हजार रुग्‍णांना कोव्‍हीड सेंटरच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध दिल्‍याने त्‍याचा दिलासा मि‍ळाला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने मराठा ओबीसी विद्यार्थ्‍यांसाठी ५० टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय राज्‍यात फक्‍त आपल्‍या संस्थेने घेतला आहे.

इतर शिक्षण संस्‍‍थांनीही अनुकरण करावे असे आवाहन त्‍यांनी केले. शेतक-यांना या मार्गाचा लाभ व्‍हावा या उद्देशाने सदर पुलाच्‍या कामास नाबार्ड अंतर्गत निधी मंजुर झाला असल्‍याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर पाटील यांनी सांगितले. येत्‍या वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण करण्‍यात येणार असून, पोच रस्‍त्‍यांसह हे काम करण्‍याबाबतचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.