file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-देशांतर्गत रेल्वे, विमान व बस प्रवासासह मॉल सुरु झाले आहे. हे सर्व सुरु करण्यास परवानगी देणार्‍या महाविकास आघाडी सरकारला साईमंदिर सुरू करण्यास अडचण काय? असा सवाल शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांनी केला आहे.

गोंदकर म्हणाले, सर्वकाही सुरळीत सुरु करण्यात आलेले असताना शिर्डीचे साईमंदिर बंद ठेवले जात आहे. नेमके यातून राज्य शासनाला काय साध्य करायचे आहे? शासनाने प्रवास, उद्योग व्यवसाय, मॉल यांना सुरू ठेवण्यासाठी जे नियम अटी व निकष ठेवले आहे त्याच नियमानुसार भाविकांसाठी साई मंदिर खुले का करीत नाही.

देशांतर्गत इतर राज्यांत देवस्थान भक्तांसाठी खुले आहे तर शिर्डीसह परिसरातील लाखो नागरिकांची उपासमार होत असताना शासन मंदिरं बंद ठेवून नेमके काय साध्य करू पाहत आहे.

शिर्डी पंचक्रोशीतील लाखो नागरिकांची होणारी उपासमार टाळण्यासाठी करोनाच्या आड न लपता सरकारने साई दर्शनापूर्वी चोवीस तास अगोदरच आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणार्‍या व लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांसाठी ऑनलाईन बुकिंग पद्धतीने दर्शन सुविधा सुरू करून भाविकांसाठी साईमंदिर खुले करावे, अशी मागणी गोंदकर यांनी केली आहे.

मंदिर बंद असल्याने आर्थिक चक्र बिघडले…

साई मंदिरावर शेकडो गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिर्डीतील नागरिकांबरोबरच हॉटेलसह इतर व्यवसायिक बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मालमत्ता कर तसेच वीज बिल भरणेही मुश्किल झाले आहे. छोटा मोठा व्यवसायिक व रोजंदारीवर जगणारा नागरिक अडचणीत आला आहे.