Sujay Vikhe Patil News : अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून नैसर्गिक साधन संपतीने संपन्न आहे. जिल्ह्यात उद्योगधंद्यांना सर्वाधिक वाव असून येणाऱ्या काळात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना चालना देऊन उद्योजक कशा प्रकारे निर्माण होतील यावर माझा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालूक्यात निवडणूक प्रचारार्थ आपला दौरा ठेवला होता. यावेळी पेडगाव येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला स्थानिक विक्रम पाचपुते, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, तसेच स्थानिक पदाधिकरी आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत बोलताना सांगितले की, जर जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात उद्योगधंद्यांना पोषक वातावरण असून पायाभूत सेवा सुविधा वाढविणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
उद्योगासाठी अहिल्यानगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यस्थानी असल्याने नाशिक, औरंगाबाद, पुणे, जालना, परभणी, ठाणे, बीड सोलापूर जिल्ह्याच्या सिमा लागल्या आहेत. यामुळे दळवळणाच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्व अधिक आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असल्याने देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुतंवणुक होत आहेत.
जागतिक किर्तीच्या कंपन्या भारतात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून उद्योजकांना विविध संधी दिल्या जात आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मनुष्यबळ आहे. यामुळे आपल्या जिल्ह्याला संधी असून जिल्ह्यात उद्योग आल्याने त्याला लागणाऱ्या पुरक धंद्यांना मोठी संधी तरूणांना उपलब्ध होणार आहेत. सर्विस सेक्टर आणि आय टी सेक्टर मध्ये नगर मधील तरुण उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात उद्योगधंद्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे उत्पन्न कसे वाढेल याकडे आपले लक्ष असणार राहणार आहे असे डॉ. विखे म्हणाले.
सध्या जिल्ह्यात अनेक तरूणांना केवळ रोजगारासाठी इतर जिल्ह्यात राज्यात जावे लागत आहे. यामुळे त्यांना जिल्ह्यात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी देण्याचे काम आपल्याकडून केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सुजय विखे यांच्या प्रचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. विविध विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडत असल्याने मतदारांचा कौल सुद्धा त्यांच्या बाजूने दिसत आहे. तर महायुती आणि घटक पक्षातील कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या जोडीला असल्याने त्यांच्या प्रचारसभा गर्दीने फुलत आहेत.