अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्यामुळे घोड मधुन तातडीने आवर्तन सोडावे तसेच कुकडीच्या चालु आवर्तनातुन तलाव व नाले भरावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली आहे.

सध्या ०३/०८/२०२१ रोजी घोड धरणाचा पाणीसाठा २६७५ द.ल.घ.फूट [ उपयुक्त पाणीसाठा १५६९ द.ल.घ.फूट (३२.२०%)] इतका झाला असुन घोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांकरिता कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत लाभधारकांकडून मागणी होत आहे.

तसेच कुकडी धरणामधून कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी चालू आहे. या पाण्यामधून माझ्या श्रीगोंदा तालुका लाभक्षेत्रातील सीना धरण, विसापूर तलाव, मोहरवाडी तलाव, औटेवाडी तलाव, लेंडीनाला तलाव, घोडेगाव तलाव, भावडी तलाव, वेळू तलाव, व इतर सर्व लहान मोठे तलाव व बंधारे जास्तीत जास्त क्षमतेने भरून घेणे गरजेचे आहे.

तरी घोड प्रकल्पाच्या कालव्याद्वारे खरीप हंगामातील प्रथम आवर्तन सुरु करण्याबाबत व कुकडी ओव्हरफ्लो च्या पाण्यामधून तलाव बंधारे भरणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी जलसंपदा मंत्री पाटील यांच्या कडे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.