Kitchen Care Tips:- बऱ्याचदा घरामध्ये लागणारे धान्य तसेच डाळी व इतर आवश्यक असलेल्या गोष्टी आपण घरामध्ये साठवत असतो. परंतु साठवताना योग्य काळजी घेऊन देखील बऱ्याचदा धान्य किंवा डाळींना कीड लागायला लागते व मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून नुकसान होते.
घरातील डाळींना कीड लागू नये म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु तरीदेखील किड नियंत्रण अपेक्षितरित्या होताना दिसून येत नाही.
डब्यामध्ये ठेवलेल्या डाळींना कीड लागण्याची समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. परंतु किड लागू नये याकरिता प्रभावी उपाययोजना करणे खूप गरजेचे असते. यामध्ये साठवणूक योग्य ठिकाणी करणे हे खूप गरजेचे असते. परंतु साठवणूक व्यतिरिक्त काही प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर कीड लागण्यापासून डाळींचे रक्षण करता येऊ शकते.
या छोट्या गोष्टी करा आणि डाळींचे कीड लागण्यापासून बचाव करा
1- मोहरीच्या तेलाचा वापर- मोहरीचे तेल जर तुम्ही डाळींना लावले तर कीड लागण्यापासून डाळींचा बचाव होतो. कारण यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगसला मारण्याचे गुणधर्म असतात व त्यामुळे डाळीवर जर हे तेल लावले तर डाळ खराब होत नाही व या तेलाचा तीव्र स्वरूपाचा वास किडींना डाळींच्या जवळ येऊ देत नाही.
तुम्हाला जर मोहरीच्या तेलाचा वापर याकरिता करायचा असेल तर समजा एक किलो डाळ घेतली व तुम्हाला ती साठवायची असेल तर अगोदर डाळ स्वच्छ आणि कोरडी असावी हे या मध्ये लक्षात ठेवावे. नंतर डाळीमध्ये तेल मिसळून घ्यावे व हाताने त्याला चांगल्या प्रकारे चोळून घ्यावे. नंतर डाळ थोड्यावेळ करता उन्हामध्ये ठेवावी व नंतर एअर टाईट किंवा जाड डब्यामध्ये स्टोअर करावी.
2- फॉईल पेपरचा वापर- बऱ्याचदा आपण ज्या ठिकाणी डाळ साठवलेली असते त्या ठिकाणी थोडाफार ओलावा जर असला तर डाळ खराब व्हायला लागते व त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसायला लागतो व बुरशीचे प्रमाण देखील वाढते. अशा प्रकारची समस्या जर येत असेल तर त्याकरिता तुम्ही फॉईल पेपरचा वापर करू शकतात.
या पेपरचा वापर करताना फॉईल पेपरचे छोटे तुकडे करावे आणि डाळीच्या कंटेनरमध्ये म्हणजेच डब्यामध्ये ते ठेवून द्यावेत. त्यामुळे डाळीमध्ये थोडाफार ओलावा असेल तर तो पटकन निघून जातो आणि डाळ सुरक्षित राहते व किडींपासून देखील डाळींचा बचाव होतो.
3- लिंबाच्या पानांचा वापर- लिंब त्याच्या कडवटपणासाठी प्रामुख्याने ओळखला जातो व यामध्ये अँटिफंगल व अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने या पानांमुळे कीड आणि बुरशी दूर राहते.
डाळींना कीड लागू नये याकरिता जर लिंबाच्या पानांचा वापर करायचा असेल तर पानांना अगोदर स्वच्छ धुऊन कोरडे करावे आणि नंतर ही पाने डाळीच्या डब्यामध्ये ठेवावेत. अशाप्रकारे जर तुम्ही पाने ठेवली तर ते कीड आणि बुरशी मारण्यासाठी प्रभावी ठरतात.