Vastu Tips For Bedroom:- घराचे बांधकाम करताना किंवा नवीन घर घेताना वास्तुशास्त्राचे नियम प्रत्येकजण पाळत असतो. नवीन घराचे बांधकाम जर करायचे असेल तर वास्तुशास्त्राचे नियम काटेकोर पाळले जातील याकडे बऱ्याच जणांचे लक्ष असते व त्यानुसारच घराची अंतर्गत आणि बाह्यरचना प्रामुख्याने ठरवली जात असते किंवा त्या पद्धतीचा प्लॅनिंग केला जातो.
कारण वास्तुशास्त्रानुसार जर घराची अंतर्गत किंवा बाह्यरचना करण्यात आली नाही तर घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होऊन घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते. त्यामुळे अशा प्रकारची समस्या टाळण्याकरिता वास्तुशास्त्राचे नियम बरेच जण पाळताना आपल्याला दिसून येतात.
यात घरातील बेडरूम कुठे असावे? घरामध्ये एखादे रोपटे लावायचे तर नेमकी त्याची दिशा कोणती ठेवावी किंवा घरातील देवघर कुठे असावे? या व अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असतात व त्यानुसारच बरेचजण सगळ्या बाबींचे नियोजन करत असतात.
या अनुषंगाने जर आपण घरातील बेडरूम नेमके कोणत्या ठिकाणी असावे? त्याची योग्य दिशा कोणती? झोपताना कोणत्या दिशेला डोके करून झोपावे? लहान मुलांचे बेडरूम घरामध्ये कोणत्या दिशेला असावे? याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती आपल्याला दिसून येते. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखात घेऊ.
घरातील बेड किंवा बेडरूम कोणत्या दिशेला असावे?
जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरातील बेडरूम किंवा बेडरूममध्ये पलंग हा नेहमी नैऋत्य दिशेला असावा आणि जेव्हा या बेडवर झोपू तेव्हा डोके दक्षिण दिशेला असेल अशा पद्धतीने त्या बेडची रचना किंवा व्यवस्था करावी.
त्यामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते असे वास्तुशास्त्र म्हणते. तसेच दक्षिण दिशेला पाय करून किंवा पाय ठेवून झोपू नये हे देखील यांमध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.
कारण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर यामध्ये दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते व दक्षिण दिशेला जर पाय ठेवून झोपला तर पितृदोष यामुळे मिळू शकतो किंवा त्याचा त्रास होऊ शकतो.तसेच योग्य दिशेला डोके ठेवून झोपावे. तुम्ही जर मास्टर बेडरूममध्ये झोपत असाल तर आपले डोके नेहमी दक्षिण व पश्चिम दिशेला असू द्यावे.
उत्तर दिशेकडे डोके राहणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तर दिशेला जर डोके असेल तर झोपेवर त्याचा विपरीत परिणाम होतो व शरीरावर देखील नकारात्मक परिणाम जाणवायला लागतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार भिंतीला खेटून किंवा लागून बेड नसावे. तसेच कमी क्षेत्रफळाच्या खोल्या असतील तर अशा खोल्यांमध्ये बेड कोपऱ्यात ठेवू नये. बेड नेहमी खोलीच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे.
घरातील लहान मुलांचे बेड कोणत्या दिशेला असावे?
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर मुलांचे डोके झोपताना नेहमी पूर्व दिशेला असेल अशा पद्धतीने बेडची रचना असावी. असे केल्यामुळे मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच मुलांसाठी दक्षिण किंवा आग्नेय दिशा देखील योग्य असते. वास्तुशास्त्र म्हणते की या दिशेला डोके ठेवून जर लहान मुले झोपली तर त्यांचा अध्यात्माकडे कल वाढतो.