Silver Ornaments Shining Tips:- सोने-चांदीचे मार्केट सध्या खूप जोरात असून सोन्या आणि चांदीच्या दराने कधी नव्हे एवढी उच्चांकी पातळी गाठली आहे. परंतु तरीदेखील सोने किंवा चांदी खरेदीमध्ये घट न होता ती वाढतानाच दिसून येत आहे. तसेच दिवाळी सारख्या सणाच्या कालावधीत तर सोने आणि चांदीची अगदी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.
यामध्ये सोने व चांदी पासून दागिने तयार केली जातात व खरेदी केली जाते. चांदीच्या दृष्टिकोनातून बघितले तर चांदीची चैन, चांदीचे पेंडंट, चांदीचे पैंजण आणि पुरुषवर्ग देखील चांदीच्या अंगठ्या वगैरे अशा बरीच डिझाईन खरेदी करतात.
परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की, कालांतराने चांदी ही काही जणांच्या अंगावर काळी पडायला लागते किंवा घरात ठेवली तरी काळी पडते. यामुळे चमकदार अशी चांदी दिसायला देखील व्यवस्थित दिसत नसल्याने बरेच जण अक्षरशः वापर कमी करतात.
अशाप्रकारे काळी पडलेली चांदी पुन्हा चमकावी याकरता बऱ्याच उपाययोजना केल्या जातात. परंतु काही केल्या चांदी अगोदर सारखी चमकदार होत नाही. त्यामुळेच आपण या लेखात अशा काही सोप्या ट्रिक्स बघणार आहोत.ज्यांचा वापर केल्याने काळी पडलेली चांदी चमकदार होण्यास मदत होईल.
या ट्रिक्स वापरा आणि काळी पडलेली चांदी परत चमकदार करा
1- पाणी आणि बेकिंग सोड्याचा वापर- चांदीचे दागिने साफ करण्यासाठी आणि चमकदार होण्यासाठी हा उपाय खूप फायद्याचा आहे. हा उपाय करताना अगोदर बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून घ्यावा व त्यानंतर त्याची पेस्ट बनवावी व ती दागिन्यांवर लावून 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यावेत. थोड्यावेळाने कोमट पाण्याने दागिने धुऊन टाकावेत. अशा पद्धतीने तुम्ही काळे पडलेले चांदीचे दागिने पुन्हा चमकदार करू शकतात.
2- लिंबू आणि मिठाचा वापर- काळे पडलेले चांदीचे दागिने चमकदार करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करू शकतात. या उपायांमध्ये तुम्हाला एका भांड्यात मीठ घ्यावे लागेल व त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळून घ्यावे.
त्यानंतर मीठ व लिंबाची पेस्ट बनवून ती दागिन्यांवर लावावी व दहा पंधरा मिनिटे दागिने ठेवून द्यावेत. त्यानंतर ते दागिने कोमट पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसून घ्यावेत. अशा पद्धतीने चांदी पुन्हा चमकदार होते.
3- पाणी आणि विनेगरचा वापर- वारंवार चांदीचे दागिने काळे पडत असतील तर त्यांना पुन्हा चमकदार करण्यासाठी तुम्ही विनेगरचा देखील वापर करू शकतात. हा उपाय करताना एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे व त्यामध्ये व्हिनेगर टाकून एक चांगले मिश्रण किंवा द्रावण तयार करावे.
या द्रावणामध्ये काळे पडलेले चांदीचे दागिने दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत बुडवून ठेवावेत. त्यानंतर कोमट पाण्याने दागिने धुवावे आणि कापडाने पाणी टिपून कोरडे करून घ्यावे. हा उपाय केल्याने देखील काळे पडलेले चांदीचे दागिने परत चमकदार होतात.