Prevention Tips From Mosquito:- पावसाळ्याचा कालावधी असो किंवा कुठलाही ऋतू यामध्ये बऱ्याचदा आपल्याला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. डासांचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे आजारांना आयतेच निमंत्रण मिळते.
तुम्हाला माहित आहे की डासांमुळे मलेरिया तसेच डेंगू सारख्या आजारांचा सामना करावा लागतो यामुळे नाहकमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो.
डासांचा नायनाट व्हावा किंवा डासांचे नियंत्रण मिळावे याकरिता अनेक पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु घरामध्ये मॉस्किटो किलर सारखे उपाय केल्यामुळे बऱ्याचदा त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
त्यामुळे सुरक्षित अशा उपायोजना करणे खूप गरजेचे असते. तुमच्या घरात देखील डासांचा प्रादुर्भाव वाढला असेल तर तुम्ही या लेखात सांगितलेल्या काही सोप्या उपाययोजना करून डासांवर नियंत्रण मिळवू शकता.
डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे
1- कडुलिंब, नारळाचे तेल व कापुराचा वापर– कडुलिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही घरातून डासांना सहजपणे पळवून लावू शकतात. हा उपाय करताना सगळ्यात अगोदर कडुलिंबाची पाने घ्यावी व ती नीट धुवून त्यांची पेस्ट बनवावी त्या पेस्टमध्ये थोडे कापूर टाकावे.
नंतर पाण्याच्या मदतीने ती पेस्ट थोडी पातळ करून घ्यावी व पातळ केल्यानंतर पाण्याच्या मदतीने गाळून घ्यावे. यामध्ये खोबरेल तेल मिसळून चांगले मिसळून तयार करून हे मिश्रण रिकाम्या स्प्रे बाटलीत भरून त्याचा वापर करू शकता.
इतकेच नाही तर हे मिश्रण तुम्ही रिकाम्या मॉस्किटो रिपेलेंट मशीनच्या रिकाम्या बाटलीत भरून वापरू शकतात. या मिश्रणाचा वापर करून तुम्ही घरातील डास कमी करू शकतात. तसेच यामुळे तुम्हाला देखील कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुष्परिणामांचा त्रास होणार नाही.
2- लसणाचा वापर– लसणामध्ये सल्फर असतो व त्यामध्ये डासांना दूर ठेवणारे गुणधर्म आहेत. लसणाचा रस डासांना घातक असून डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या पाण्यामध्ये उकळून घ्याव्यात व ते पाणी थंड होऊ द्यावे. नंतर ते पाणी स्प्रे बाटलीत भरावे व नंतर संपूर्ण घरात या कीटकनाशक पाण्याची फवारणी करावी.
3- सुगंधी तेलाचा वापर– तुम्हाला जर स्वतःच्या घरातल्या लोकांचे संरक्षण करायचे असेल आणि डास देखील दूर करायचे असतील तर तुम्ही लव्हेंडर तसेच कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी व पुदिना यापैकी एखाद्या तेलाचा वापर करू शकतात.
हा उपाय करताना एका रिकाम्या स्प्रे बाटलीत यातील एका तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळावे आणि ते घरामध्ये शिंपडावे. तसेच तुमच्या संरक्षणासाठी कडुलिंबाचे तेल, खोबरेल तेल व लव्हेडर तेलाचे काही थेंब एकत्र करून अशा संमिश्रित तेलयुक्त पाण्याचा स्प्रे तयार करून घ्यावा व हे पाणी सर्वत्र फवारून घ्यावे. त्यामुळे देखील डासांचा नायनाट होतो.