Wheat Storage Tips:- बऱ्याचदा आपण घरामध्ये वर्षभर पुरेल इतका गहू, ज्वारी आणि बाजरी सारख्या धान्याचा साठा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा साठा करून ठेवत असतो. अगदी शहरांमधील नागरिक देखील वर्षभर पुरेल इतका गहू विकत घेऊन तो घरात साठवून ठेवतात.
याव्यतिरिक्त शेतकरी बंधू देखील शेतातून उत्पादित होणारे गहू किंवा इतर धान्य बाजारपेठेत विकून उरलेला आपल्या घरासाठी वर्षभर पुरेल इतका काढून तो साठवतात. परंतु बऱ्याचदा गहू आणि इतर धान्य साठवताना जर ते व्यवस्थित ठेवले नाही तर त्यामध्ये भुंगे आणि इतर कीड लागायला लागते व गव्हाचा चुरा बनायला सुरुवात होते.
जर त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले तर थोड्या कालावधीत अशा प्रकारचे धान्य खाण्यायोग्य राहत नाही. गव्हाला कीड किंवा भुंगे लागू नये म्हणून अनेक उपाय केले जातात. परंतु तरीदेखील याचा अपेक्षित असा परिणाम दिसून येत नाही. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये घरी गहू साठवण्याचे काही मार्ग आणि टिप्स बघणार आहोत ज्यायोगे वर्षभर तुम्ही घरात गहू साठवला तरी त्याला कीड किंवा भुंगे लागणार नाही.
या टिप्स वापरा आणि घरामध्ये गहू साठवा
1- जर तुम्ही बाजारातून वर्षभर पुरेल इतका गहू विकत घेतला व त्याला घरात साठवायचे असेल तर गव्हामध्ये कापूर, लवंग, कडुनिंबाची पाने, खडे मीठ तसेच माचीसची काडी इत्यादी ठेवू शकतात. कारण या ज्या काही वस्तू आहेत यांचा वास खूप तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे अशा प्रकारची कीड किंवा भुंगे गव्हा जवळ येत नाहीत.
2- एवढेच नाही तर बरेच व्यक्ती घरी गोण्यांमध्ये धान्य साठवून ठेवतात. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने गोण्या किंवा पोत्यांमध्ये धान्य साठवत असाल तर अशा पद्धतीने गोण्या किंवा पोते जमिनीवर ठेवू नये. कारण जमिनीवरील ओलाव्यामुळे हे धान्य खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोते किंवा गोण्या हे जमिनीपेक्षा दहा इंच उंच बांधलेले एखाद्या फळी किंवा प्लेट इत्यादीवर ठेवावे.
3- जुन्या किंवा वापरलेल्या गोणीमध्ये गहू किंवा इतर धान्य कधीही ठेवू नये. त्यामुळे बाजारातून नवीन गोणी खरेदी करून त्यामध्ये धान्य ठेवावे. परंतु तुम्हाला जर जुनी गाणी पुन्हा वापरायची असेल तर तिला अगोदर एक टक्के मॅॅलिथीऑन द्रावणामध्ये दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवावे व ते पूर्णपणे स्वच्छ करून वाळवावे. वाळल्यानंतरच त्यामध्ये गहू भरून साठवून ठेवावा.
3- गहू आणि इतर धान्यांमध्ये जर ओलावा असेल तर ते लगेच डब्यामध्ये किंवा गोणी मध्ये भरू नये. भरण्याआधी असे गहू किंवा धान्य ओले असेल तर त्यामध्ये किडे, बुरशी व इतर जिवाणूंची वाढ होऊ शकते व धान्याची पोषण व गुणवत्ता कमी होते. पावसाळ्यामध्ये या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
4- समजा तुम्हाला गहू एखाद्या टाकीत किंवा गोणीमध्ये ठेवायचा असेल तर तो उन्हात ठेवावा आणि नीट सुकवून घ्यावा. असे केल्यामुळे त्यामध्ये ओलावा राहत नाही व गहू किंवा इतर धान्य बरेच दिवस टिकते.
5- तसेच तुम्हाला गहू किंवा इतर धान्य पेटी किंवा गोणी, कणगी इत्यादीमध्ये ठेवायचे आहे त्याच्या तळाशी वाळलेली कडुलिंबाची पाने व्यवस्थित पसरवून घ्यावीत. त्यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही. याशिवाय तुम्ही लवंग तसेच कापूर व माचीसच्या काड्या देखील टाकून ठेवल्या तरी धान्य चांगले राहते.